पित्ताशयातील खडे (Gallstone )
======================
बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना? हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात की ज्यांनी इतर कोणत्या तरी कारणांसाठी पोटाची सोनोग्राफी केली असताना त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे निदान केले गेलेले असते. म्हणूनच आपण हे खडे का व कसे तयार होतात, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, हे टाळता येणे शक्य आहे का व त्यावर काय उपाय उपलब्ध आहेत हे समजावून घेऊ या.
यकृतामध्ये पित्ताची निर्मिती होते जे पचन सुकर करण्यास फायदेशीर ठरते. पित्तामध्ये अनेक केमिकल्सचा समावेश असतो. मात्र ते साचून घट्ट झाल्यास त्याचे खडे तयार होतात. मानवी शरीरात वर्षानुवर्ष असे खडे असतात. मात्र जेव्हा हे खडे पित्त वाहून नेणार्या नलिकेत अडकतात तेव्हा वेदना होतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.
आज अनेकजनांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास झालेला आढळतो. हा विकार Gallstone किंवा Biliary calculus या अन्य नावानेसुद्धा ओळखला जातो. एका खड्यापासूनचे अनेक लहान लहान खडे पित्ताशयात आढळू शकतात. हा विकार पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
का होतात पित्ताशयात खडे..?
आपल्या शरीरात पित्ताची (Bile) निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (Gall bladder) असे म्हणतात, यामध्ये जास्त तयार झालेले पित्त साठवून ठवले जाते आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्न पचनासाठी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडले जाते. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात.
(1) पिगमेंट स्टोन्स
(2) कोलेस्टेरॉल स्टोन्स
(3) मिश्र खडे
बहुतेक रुग्णांमध्ये ते खडे मिश्र प्रकारातील असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडय़ात निघून जातात. पण त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व पित्ताशयाला सूज येते. हे खडे जेंव्हा पित्ताशयातून पित्ताशय नलिकेमधून खाली सरकू लागतात तेंव्हा अत्यंत वेदना होतात. त्या वेदनांना Biliary colic असे म्हणतात.
हा त्रास कोणास होऊ शकतो..?
वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल,अतिस्थूल व्यक्ती, जास्त तेलकट-स्निग्ध भोजन करणाऱ्यांमध्ये तसेचं चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते.
पित्ताशयातील खडे होण्याची कारणे :
चयापचय (Metabolism) संबंधीत विकृतीमुळे पित्ताशयात खडे निर्माण होतात.
स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे, अति तूपकट-तेलकट खाणे. फास्ट फूड, जंक फूडचा अतिरेक.
अतिलठ्ठपणा, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभावामुळे.
पित्ताशय शोथ हे विशेष कारण आहे. पित्ताशय शोथ हा पित्ताशयचा विकार असून यामध्ये पित्ताशयाला सूज आलेली असते.
पित्तलवण (Bile salts) व कोलेस्टेरॉल यांच्या असंतुलनामुळे. पित्तामध्ये Bilirubin ची मात्रा अधिक झाल्याने पित्ताशयात खडे निर्माण होतात.
पित्ताशयातील खडे होण्याची लक्षणे :
पित्ताशयात खडे पडून राहिल्यास सहसा कोणतेही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र जेंव्हा खडे पित्ताशयातून पित्तवाहिनीत सरकतात तेंव्हा लक्षणे जाणवू लागतात.
त्यामध्ये खालील लक्षणे प्रामुख्याने असतात.
पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. त्याठिकाणी स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवणे.
वेदनासमयी उलटी होणे, मळमळणे, ताप येणे.
भोजनानंतर वेदना अधिक होणे,
खारट डेकर येणे, भारीपण, गॅसेस होतात. जळजळ होऊ लागते, यासारखी लक्षणे जाणवतात.
त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतड्यात नेणारा मार्ग बंद होतो व पित्तरस यकृतात साचू लागते, त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात.
पित्ताशयातील खडय़ांमुळे पचनतंत्र विकृती, पित्ताशय जीर्ण शोथ, कावीळ (Obstructive Jaundice), स्वादुपिंडाला (Pancrease) सुज येणे हे विकारही होऊ शकतात.
पित्ताशयातील खडयांचे निदान :
रुग्ण इतिहास, आहार विहारासंबधी माहिती आणि शारिरीक तपासणीद्वारे आपले डॉक्टर याच्या निदानास सुरवात करतात. तसेच अचूक निदानासाठी ते खालील वैद्यकिय तपासण्या करावयास सांगु शकतात. यामध्ये,
सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी जसे सिरम बिलीरुबिन तपासणी इ. याशिवाय एण्डोस्कोपी, एक्स-रे परीक्षण करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.
पित्ताशयातील खडयांवर उपचार मार्गदर्शन :
अौषधोपचार –
आज पित्ताशयातील खडे विरघळण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात.
पित्तनलिकेतील खडे काढणे –
दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, एक छोटेसे छेद करून दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडे काढता येतात.
मात्र पुन्हा खडे होऊ नये म्हणून शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढणे योग्य ठरते.
उपाय
एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो.
जर एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडय़ास जोडली जाते.
टाळण्यासाठी काय करावे?
१) जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.
२) तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.
३) जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.
४) चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.
५) रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.
पित्ताशयात खडे होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पित्तदोष संतुलित राहण्याकडे कायम लक्ष ठेवणे आवश्यक असते. भूक मंदावणे, मळमळणे यासाठी जेवणाआधी आलं-लिंबाचा रस व मध यांचे मिश्रण घेण्याचा फायदा होईल. नाश्त्यासाठी, तसेच संध्याकाळी पाचच्या सुमाराला साळीच्या लाह्या खाणे चांगले. पित्तसंतुलनासाठी "संतुलन पित्तशांती गोळ्या‘ घेणे, "सॅन पित्त सिरप‘ घेणे चांगले. प्यायचे पाणी उकळून गाळून घेतलेले असावे. कृत्रिम रंग, रासायनिक प्रिझर्वेटिव्हज् टाकलेले खाद्य पदार्थ टाळणे आवश्यक. ढोबळी मिरची, आंबट दही, कोबी, फ्लॉवर, चिंच, टोमॅटो, अननस, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ टाळणे श्रेयस्कर.
===================================================
हे घरगुती उपाय पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास सुरवातीच्या टप्प्यात असल्यास फायदेशीर आहे. खूपच त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ऑपरेशनच्या माध्यमातून पित्ताशयाचे खडे काढण्याचा निर्णय घ्या.
सफरचंद - यामधील मॅलिक अॅसिड पित्ताशयातील खड्यांची वाढ कमी करण्यास तसेच ते मऊ करण्यास मदत करतात. यामुळे ते सहज बाहेर पडण्यास मदत होते. अॅपल सायडर व्हिनेगर कोलेस्ट्रेरोलच्या निर्मीतीचे प्रमाण कमी करतात. कोलेस्ट्रेरॉलदेखील पित्ताशयाच्या खड्यांची निर्मिती होण्याचे एक प्रमुख कारण आहे. ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगर मिसळल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
हळद - आयुर्वेदानुसार हळदीमुळे यकृताचे कार्य तसेच पित्ताचा प्रवाहदेखील सुधारते. नियमित हळदीचा आहारात समावेश केल्यास पित्ताशयाच्या खड्याची निर्मिती कमी होण्यास मदत होते. हळदीमुळे ते विरघळण्यास मदत होते. अर्धा चमचा हळद मधासोबत नियमित घेतल्यास पित्ताशयाचे खडे होत नाहीत.
ग्रीन टी - कॉफीमुळे पित्ताशयाचे खडे होण्याचे प्रमाण कमी होते. त्यातील कॅफीन घटक पित्ताशयाच्या बाहेरील बाजूचे आकुंचन करते. यामुळे खड्यांची निर्मिती कमी होते. पण कॉफी हे उत्तेजक पेय असल्याने ते पिण्याची तलफ सतत होऊ शकते. म्हणूनच कॉफ़ी ऐवजी ग्रीन टी पिणे अधिक फायद्याचे आहे. यामध्ये कॅफिनचे प्रमाण तुलनेत कमी असते.
एरंडेल तेल - पित्ताशयाच्या खड्यांचे दुखणे अतिशय वेदनादायी असते. यावर एरंडेल तेल हा फायदेशीर घरगुती उपाय आहे. एका कापडावर एरंडेल तेलाचे काही थेंब घालून दुखणार्या भागावर ठेवावे. त्याखाली प्लॅस्टिक रॅप घालून गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. हा प्रयोग तासभर सलग तीन दिवस केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
गोखरू - पित्ताशयातील तसेच मूत्रमार्गातील समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये गोखरूचा वापर केला जातो. गोखरूच्या पावडरने यकृत डीटॉक्सिफाय करण्यास मदत होते. मात्र हा उपाय करताना योग्य आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.
====================================================
डॉ. सुयोग दांडेकर
गोपियूष उपचार खूप प्रभावीपणे उपयोगी ठरते.
====================================================
त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)
पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचे नाही. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खडय़ामुळे त्रास होत असेल तरच त्यावर शस्त्रक्रियेची गरज असते..